तणाव नियोजन

तणावजन्य परिस्थितीचा परिणाम सर्वांवर सारखा होत नसतो. व्यक्तिमत्वानुसार त्यात फरक पडतो.काहींना छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेण्याची सवय असते तर काहींची ताण सहन करण्याची क्षमता जास्त असते. ही तणावाला सामोरे जाण्याची क्षमता काही लोकांत कशी निर्माण होते, याचा अभ्यास केल्यावर लक्षात येते की जुन्या अनुभवांवरून शिकण्याची वृत्ती, तणावजन्य परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टीकोन, सवयी, कौशल्ये, वैचारिक क्षमता यांचा तणावास सामोरे जाण्याच्या क्षमतेत मोठा सहभाग असतो. काही जनुकीय गुणधर्म आणि मज्जासंस्थेतील केंद्रांतील उद्दीपन क्षमता (उत्तेजित होण्याची जन्मजात क्षमता) यांचाही यात मोठा सहभाग असतो. या वरून एक गोष्ट लक्षात येते की तणावजन्य घटक (स्ट्रेसर्स) तणाव निर्मितीस एकटे कारणीभूत नसतात तर त्या घटकांना आपण कसे तोंड देतो ही बाब जास्त महत्वाची असते.

 थोडक्यात तणावपूर्ण परिस्थिती बदलणे जरी फारसे आपल्या हातात नसले तरी त्या परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता आपण आपल्यात निर्माण करू शकतो आणि ताण तणावामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळू शकतो.

एखाद्या तणावपूर्ण परिस्थितीस आपण दोन प्रकारच्या प्रतिक्रिया देऊ शकतो. १) भावनेच्या भरातील प्रतिक्रिया (इमोशनल रिस्पॉन्स) उदा. गोंधळणे, चिडणे, घाबरणे २) वैचारिक प्रतिसाद (कॉग्नेटिव्ह रिस्पॉन्स)
प्रयत्नपूर्वक सराव करून आपण तणावास वैचारिक प्रतिक्रिया देण्याची क्षमता निर्माण करू शकतो. तणावास तोंड देण्याचे उपाय पाहण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की कधी कधी काही गोष्टींचा तणाव येणे ही गोष्ट पूर्णपणे नैसर्गिक आहे. आपण तणाव पूर्णपणे टाळू शकत नाही. तणावास तोंड देण्याची क्षमता विकसित करताना अपरिहार्यपणे तणाव निर्माण झाला तरी पुन्हा लवकरात लवकर पूर्वपदावर येण्याची क्षमता निर्माण करणेही गरजेचे आहे.