व्यायाम हा पी.सी.ओ.एस्.च्या उपचारांचा अतिशय महत्वाचा भाग आहे. एरोबिक (हृदय कार्यक्षमता वाढविणारे) आणि स्नायूंची ताकद वाढविणारे असे दोन्ही प्रकारचे व्यायाम इन्शुलिनची निष्प्रभता कमी करतात. ज्यावेळेस स्नायूंना काम पडते तेव्हा ते इन्शुलीन अधिक क्षमतेने उपयोगात आणतात. इन्शुलीनची निष्प्रभता हीच पुरुषी हार्मोन्स वाढवून बीजनिर्मितीस अडथळा आणत असते. व्यायामामुळे इन्शुलिनची कार्यक्षमता वाढते आणि त्यामुळे बीजनिर्मिती सुधारते.
व्यायामाचे फायदे :
व्यायाम हा पी.सी.ओ.एस्.च्या उपचारांचा महत्वाचा भाग आहे. एरोबिक आणि ताकदीचे व्यायाम, हे दोन्हीही प्रकार इन्शुलीन स्त्राव सुधारवतात. व्यायामानंतर इन्शुलीनचा योग्य वापर करून घेण्याची स्नायूंची क्षमता वाढते. व्यायाम आणि योग्य आहार हे दोन्ही घटक स्त्रीबीज निर्मिती नियमित होण्यास महत्वाची भूमिका वठवतात.
शारीरिक क्रीयाशिलतेचे फायदे
१) इन्शुलीन चे कार्य सुधारते
२) वजन नियंत्रित राहते
३) स्त्रीबीज निर्मिती सुधारते
4) शरीर सुडौल बनून मनस्वास्थ्य सुधारते
व्यायामाचा अभाव :
बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, वजने उचलण्याची फारशी गरज नसलेले व्यवसाय यामुळे स्नायूंचे आकारमान हळूहळू कमी होत जाते. पूर्वीपेक्षा निम्मी पावलेही चालणे आजकाल होत नाही. स्नायू हा शरीतातील चरबी किंवा उर्जा जाळण्याचा एकमेव बाह्य स्त्रोत आहे. चालणे , पळणे, वजन उचलणे, योग या सर्व व्यायाम प्रकारांचे स्वरूप भिन्न आहे. ताकद, चिवटपणा, लवचिकता, हृदयाची व श्वासांची क्षमता वाढविणे या वेगवेगळ्या फुटपट्ट्या लावल्या तर प्रत्येक व्यायाम वेगळा आहे असे लक्षात येईल . म्हणून आहाराप्रमाणेच व्यायाम हा समतोल व शास्त्र शुद्ध असणे खूप गरजेचे आहे. एरोबिक (जॉगिंग इ.) व ताकदीचे व्यायाम यामुळे इन्शुलीन निष्प्रभता कमी होते. जेव्हा स्नायूंमधील पेशींना काम करावे लागते तेव्हा त्यांची उर्जेची गरज वाढते आणि, इन्शुलिनला प्रतिसाद देण्याची प्रक्रिया सुधारते. व्यायामाचा अभाव , बैठी जीवनशैली, आणि अवजड वस्तू उचलण्याची वेळच येणार नाही अशा स्वरूपाच्या नोकऱ्या किंवा व्यवसाय यामुळे शरीरातील स्नायूंची कार्यक्षमता कमी होत जाते. दिवसभर ऑफिसात बसून राहणे आणि घरी आल्यावर मोबाईल, टीव्ही पुढे बसून राहणे अशी सध्याची जीवनशैली बनली आहे. दिवसभरातील आपले चालण्याचे प्रमाण ५० ते ७० % कमी झाले आहे. चरबी जाळण्याचे काम आपल्या शरीरात आपण फक्त स्नायुंकडूनच करून घेऊ शकतो.