डाएटिंग म्हणजे उपासमार अशी एक सर्वसामान्य समजूत असते. तसे मुळीच नाही. अनेकदा डाएट म्हणून काहीतरी भलतेच, महागडे, परदेशी पदार्थ सुचविले जातात. वजन कमी करणे हाच केवळ डाएटचा उद्देश नसतो. खरेतर वजन किंवा चरबी कमी करणे हा डाएटचा आणि जीवनशैलीतील बदलांचा फक्त एक भाग असतो. किंवा असे म्हणूयात की तो योग्य जीवनशैलीचा अपरिहार्य परिणाम असतो. आपले डाएट हे आपण लहानपणापासून जे खात आलोय त्याच्याशी मिळतेजुळते हवे. आपल्या आवडी निवडी, गुणसूत्रे, आपल्या कामाचे स्वरूप याच्याशी त्याचा मेळ हवा.
त्यात सर्व आवश्यक पोषणद्रव्ये योग्य प्रमाणात असावीत. थोडक्यात अतिरेकी डाएट टाळावे. डाएटिंग मध्ये सतत येणाऱ्या नव्या नव्या लाटांच्या आहारी न जाता समतोल आहार घेण्यावर भर द्यावा.
आहाराला पी.सी.ओ.एस्. उपचारात इतके महत्व का ?
माझे वजन काही फारसे जास्त नाही, मग मला डाएटिंगची काय गरज आहे? प्रथम हे लक्षात घेणे गरजेचे आहे की फक्त वजन कमी करणे हे आपले ध्येय नाही तर अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी करून स्नायू आणि हाडांची घनता आपल्याला वाढवायची आहे. स्नायू ही आपली शर्करा जाळण्याची भट्टी आहे. ती मजबूत करायची आहे.
या प्रक्रियेत वजन वाढूही शकते. अनेकदा कमी वजनाच्या स्त्रियांतही पी.सी.ओ.एस्.ची लक्षणे दिसतात. वजन जरी कमी असले तरी इन्शुलीन निष्प्रभता आणि इतर हार्मोन्सच्या असंतुलनामुळे वंध्यत्व, मधुमेह आणि इतर दुष्परिणाम होण्याचे धोके संभवतात.