सकस आहार, नियमित व्यायाम, ताण तणाव कमी करणे या गोष्टी म्हणजेच पी.सी.ओ.एस्.शी लढाईतील पहील्या फळीतील बिनीचे सैनिक! पण पी.सी.ओ.एस्.शी लढाई ही अनेक आघाड्यांवर लढावी लागते. कारण हा आजारच गुंतागुंतींच्या घटकांनी बनला आहे. आधुनिक युगात सर्वच पोषक घटक अन्नाद्वारे मिळणे अवघड असते. त्यामुळं काही पोषक घटक हे पूरक औषधांच्या स्वरुपात घ्यावे लागतात. निरनिराळ्या संशोधनात निरनिराळे पूरक पोषक द्रव्ये सुचविण्यात आलेली आहेत. यातील नेमकी कुठली पोषक द्रव्ये घ्यावीत यावर मतमतांतरे आहेत.याबाबत एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की पूरक औषधे म्हणजे सकस आहाराला पर्याय नाही. अन्न म्हणजे केवळ पोषक द्रव्ये नाहीत. जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने, तंतू, मेद याही पलीकडे अन्न ही आपली सांस्कृतिक, मानसिक गरज असते. जीवनसत्वाच्या गोळ्या आणि प्रथिनांच्या पावडर्स घेतल्या म्हणजे सकस आहार घेण्याची गरज नाही असे मुळीच नाही.शिवाय पूरक औषधे ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.