पी.सी.ओ.एस्. हा सध्या स्त्रीरोगाच्या, वंध्यत्वाच्या क्षेत्रातील परवलीचा शब्द झाला आहे. पाळीच्या तक्रारी आणि वंध्यत्वावर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या अनेक पेशंट्स मध्ये अनपेक्षितपणे पी.सी.ओ.एस्.चे निदान होते. पी. सी. ओ. एस्. हा तरुण मुली आणि स्त्रियांमध्ये होणारा एक सर्वसाधारण आजार (खरेतर अनेक लक्षणांचा समूह) आहे . भारतात गेल्या दहा वर्षांत हा आजार एखाद्या साथीसारखा पसरलाय. की त्येक स्त्रियांना ‘आपल्याला हा आजार आहे.’ याची कल्पनाही नसते. भारतातील १५ ते २० टक्के स्त्रियांना हा आजार आहे. म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या चार पाच स्त्रियांत किमान एकीला तरी हा आजार असू शकतो. मोठ्या शहरांत हे प्रमाण याहूनही जास्त आहे. हा आजार झालेल्या स्त्रियांना गर्भवती व्हायला अडथळा येतो.
पी.सी.ओ.एस्. हा खरेतर एक लक्षणसमुच्चय आहे. काही लक्षणे एकत्रित आढळली तर त्याला लक्षणसमुच्चय म्हणतात. अनियमित पाळी, वंध्यत्व, चेहेर्यावर अनावश्यक केस उगवणे, मुरूम (तारुण्यपिटिका ), वजन वाढणे, डोक्यावरचे केस गळणे इ अनेक लक्षणे पी.सी.ओ.एस्. मध्ये एकत्रित आढळतात.